धुपेश्वरमध्ये किरकोळ वादातून ९ जणांच्या टोळीचा दोन युवकांवर हल्ला; एक ठार एक गंभीर जखमी! मलकापूरातील धुपेश्वर येथील घटना; चार आरोपी अटकेत...

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दुचाकीला कट मारल्याने झालेल्या किरकोळ वादातून ९ जणांच्या टोळीने दोन युवकांवर चाकूने हल्ला केला.यामध्ये एक युवक ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला.ही घटना ८ ऑक्टोबर रोजी  धुपेश्वर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पाच जण फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र धुपेश्वर (ता. मलकापूर) येथे मोटारसायकलला “कट” लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. वाद चिघळत जाऊन अविनाश झाल्टे (वय २१) या युवकावर टोळीतील सदस्यांनी चाकूने हल्ला केला, तर त्याला वाचविण्यास आलेल्या सतीश गजानन झाल्टे (वय २३) यालाही चाकूने भोसकण्यात आले.

गंभीर जखमी सतीशला मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अविनाश झाल्टे हा सध्या जळगाव येथे उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणी फिर्यादी सुधीर सुनिल झाल्टे (रा. चित्राळा, ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत  चार आरोपींना अटक केली.अटक केलेल्या आरोपींमध्ये साहिल सुधाकर पालवे (रा. गोपालकृष्ण नगर, मलकापूर), देवसिंग तिलकसिंग ठाकूर (रा. रामवाडी, मलकापूर)
संकेत सुनिल उन्हाळे (रा. गोपालकृष्ण नगर, मलकापूर), अरविंद उर्फ गवऱ्या अजय सोळंखे (रा. लक्ष्मी नगर, मलकापूर)यांचा समावेश आहे. तर घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींमध्ये आदित्य वानखेडे, ऋषी इंगळे, हर्षल घोंगटे, गणेश वायडे आणि कौशल्य घाटे यांचा समावेश आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात  आरोपींविरुद्ध कलम १०३(१), १०९, ११८(१), १८९(२)(४), १९०, १९१(१)(३) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत, अशी माहिती ठाणेदार हेमराज कोळी यांनी दिली.