दोन बायका घरात झोपलेल्या, एकाने नवऱ्याला बाहेर बांधलं अन् दुसऱ्याने... लोणार तालुक्यातील पळसखेड शिवारात रात्री घडली धक्कादायक घटना!
Updated: Jan 23, 2024, 16:10 IST
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तालुक्यातील पळसखेड शिवारात काल २२ जानेवारीच्या रात्री चोरीची गजब घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी महिलांसह त्यांच्या पतीला मारहाण केली, त्यांनतर अंगावरील दागिने हिसकावून पसार झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान कांताबाई कांगणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज सकाळी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कांताबाई कांगणे त्यांच्या पती व सवतीसह पळसखेड शिवारात राहतात. काल रात्री आपली सवत कायराबाई यांच्यासह त्या घरात झोपलेल्या होत्या. त्यांचे पती शंकर कांगणे घराबाहेरील खाटेवर झोपलेले होते, झोपेत असतानाच त्यांच्या पतीचा ओरडण्याचा आवाज ऐकुन त्या जागी झाल्या. समोर पाहताच तिघे त्यांच्या पतीला लोखंडी रॉडने मारहाण करत होते, त्यातील एकाने त्यांच्या पतीचे हातपाय बांधून ठेवले, त्यांनतर दोघे घराच्या आत शिरले व दोघांनी महिलांना मारहाण सुरू केली. कांताबाईला गालात चापट्या मारल्या, आणि दोघींच्याही गळ्यातील,कानातील दागिने, हिसकावले घरातून बाहेर पडताना सुध्दा दोघांनी कायराबाईला जबर मार दिला. कायराबाई तसेच शंकर कांगणे यांना गंभीर मारहाण झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे,
त्यांना उपचारासाठी जालना येथे दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे दोघांना छ. संभाजीनगर येथे हलवण्यात येत असल्याची माहिती मिळाली. चोरट्यांनी धारदार चाकूने कायराबाई यांच्या हातावर वार केला होता. आज २३ जानेवारीच्या सकाळीच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. अज्ञात चोरट्याविरुद्ध लोणार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.