नांदुऱ्यात देशी पिस्तुल घेऊन फिरणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात; निमगाव फाट्याजवळ ‘माउली बार’वर छापा....
पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध देशी बनावटीची अग्निशस्त्रे, काडतुसे व इतर हत्यारे बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्रांवर लक्ष ठेवून होते.
११ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव फाट्याजवळ काही इसम अवैध व विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तुल बाळगून आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी माडीली बार परिसरात सापळा रचला.
या कारवाईत रविंद्र विठ्ठल वेरुळकर (वय २९, रा. येवळी, ता. नांदुरा) आणि पवन कौतिकराव वेरुळकर (वय ३०, रा. येवळी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र अर्थात पिस्तुल आढळून आले. या पिस्तुलाची किंमत ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय ३० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी सरकारतर्फे फिर्याद देऊन दोन्ही आरोपींविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टच्या कलम ३, ७, २५ सह भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पथकात सपोनि यशोदा कानसे, पोहेकॉ विजय वारुळे, मंगेश सनगाळे, अमोल वनारे, सतीश नाटेकर, मनोज खरडे तसेच चालक पोहेकॉ समाधान टेकाळे यांचा समावेश होता. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील शस्त्र तस्कर आणि बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.