शस्त्राच्या धाकावर व्यापाऱ्यास लुटण्याच्या प्रयत्न करणारे दाेघे गजाआड; खामगाव शहर पाेलिसांची धडक कारवाई : देशी कट्यासह एक लाख रुपयांचा एवज केला जप्त!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राेख रक्कम घेवून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाेन चाेरट्यांना खामगाव शहर पाेलिसांनी काही दिवसातच अटक केली. या आराेपींकडून पाेलिसांनी देशी कट्यासह एक लाख रुपयांचा एवज जप्त केला आहे. गजानन यशवंत गाडेकर (वय ३५, रा. बाळापूर, जि. अकोला) आणि  योगेश दिगंबर पुरी (वय ३७, रा. शेगाव, जि. बुलढाणा)  असे आराेपींची नावे आहेत. 
खामगाव शहरातील व्यापारी सोहन गोपालदास चौधरी (वय ४२) हे १९ जुलै २०२५ रोजी रात्री १२.२५ वाजता  दुकानातून २,८२,५०० रुपये रोख घेऊन घरी जात हाेते. दरम्यान,  सुरुची पान मसाला समोर पांढऱ्या स्कुटीवर तोंडाला मास्क लावलेले दोन अज्ञात इसम आले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी याविषयी दिलेल्या फिर्यादीवरून खामगाव शहर पाेलिसांनी अज्ञात  आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण केले. अखेर १ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपी गजानन यशवंत गाडेकर आणि  योगेश दिगंबर पुरी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सुझुकी अ‍ॅक्सेस स्कुटी (किंमत अंदाजे ₹६०,०००), एक देशी कट्टा (पिस्तुल) ₹१०,०००, तीन जिवंत काडतुसे ₹६०० आणि दोन मोबाईल फोन ₹३०,००० असा एकूण ₹१,००,६०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता कलम ३१२ तसेच आर्म ॲक्टच्या कलम ३, २५ अंतर्गतही गुन्हा वाढविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.एन. पवार, सपोनि भागवत मुळीक यांच्या पथकाने केली.