मध्यप्रदेशातून गुटख्याच्या दोन गाड्या निघाल्या अन् बुलढाणा पोलिसांनी रस्त्यातच पकडल्या! तब्बल ५५ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोन बोलेरो पिकअपसह दोघे जाळ्यात!
अमरावतीच्या विशेष पथकाची जलंब पोलिसांसोबत मोठी कारवाई...
मध्यप्रदेशातून प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा चारचाकी वाहनांमधून बुलढाणा जिल्ह्यात आणला जात असल्याची गोपनीय माहिती अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी जलंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार माटरगाव ते भास्तन मार्गावर पोलिसांनी सापळा रचला. नाकाबंदीदरम्यान एमएच २८ बीबी ७४९१ आणि एमएच ५६ सी ०५०१ क्रमांकाच्या दोन बोलेरो पिकअप वाहनांना थांबवून तपासणी करण्यात आली. वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ दोन्ही वाहने ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत विश्वजित संजय गव्हांदे (वय २९, रा. शंकरनगर, खामगाव) आणि सुरेंद्र जानराव तायडे (वय ३६, रा. भीमनगर, जळगाव जामोद) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची किंमत ३४ लाख ५७ हजार १०० रुपये असून, दोन्ही बोलेरो पिकअप वाहनांची किंमत २१ लाख रुपये आहे. अशाप्रकारे एकूण ५५ लाख ५७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणी जलंब पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २७४, २७५, २२३, १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अमरावतीच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, पोलीस हवालदार अब्दुल माजिद, एजाज अहमद, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद अमीर तसेच जलंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस हवालदार होनमाने, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, शिनगारे, काकडे व गाडेकर यांच्या संयुक्त पथकाने केली. दरम्यान, मध्यप्रदेशातून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा नेमका कुणासाठी आणला जात होता? या गुटख्याचा पुरवठा जिल्ह्यातील कोणकोणत्या भागांत होणार होता? या वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? असे प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित झाले असून, पुढील पोलीस तपासातून या बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.