करवंड परिसरात अस्वलाचा हैदोस,दोन शेतकऱ्यांवर केला हल्ला! गेल्या दोन महिन्यांत सात घटना; शेतकरी-मजुरांमध्ये भीतीचे सावट...
Oct 16, 2025, 09:33 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :तालुक्यातील करवंड आणि पळसखेड परिसरात हैदोस सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल सात हल्ले झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा एकाच अस्वलाने दहा मिनिटांच्या फरकाने दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला. या घटनेत दत्ता लहाने आणि रोहिदास राठोड हे दोघे शेतकरी गंभीर जखमी झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दत्ता लहाने हे आपल्या शेतात सोयाबीन सोंगणीसाठी गेले असताना शेतात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर झडप घातली. काही अंतरावर फवारणी करणाऱ्या राठोड यांच्यावरही त्याच अस्वलाने हल्ला केला. या घटनेनंतर करवंड, पळसखेड आणि आसपासच्या गावांतील शेतकरी व मजूर भयभीत झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या या घटनांकडे वनविभागाने डोळेझाक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. २९ जून रोजी याच परिसरात झालेल्या हल्ल्यात ताराचंद चव्हाण हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर सातत्याने बंदोबस्ताची मागणी होत असतानाही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
“शेतकऱ्यांना फाडून खाण्याची वाटच पाहतायत का वनअधिकारी?” असा तिखट सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे उपचाराचा संपूर्ण खर्च पीडितांना स्वतःच्या खिशातून करावा लागत आहे.
“वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे आम्हीच जीव धोक्यात घालतोय,” अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.