चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल; ३ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला ठोकल्या बेड्या! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..

 
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
सिंदखेड राजा येथील जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. एकूण ३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. 
   याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुळजापूर येथील विष्णू प्रल्हाद खरात यांनी ३ मे, रोजी यांनी पोलिसांत तक्रार दिली की, सिंदखेड राजा येथून पेट्रोलपंपाची दिवसभराची कॅश घेऊन जात असताना दोघा अज्ञातांनी चालत्या गाडीतून काठी मारून त्यांना थांबविले होते. दरम्यान, पैसे ठेवण्यात आलेली पिशवी हिसकावून त्यातील ११ लाख ९६ हजार १३० रुपये घेवून अज्ञात आरोपी पसार झाले होते. प्रकरणी ४ मे रोजी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या प्रकरणात सिंदखेडराजा येथील रहिवासी किशोर लक्ष्मण वाघमारे यांनी घरासमोरून मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी चोरीला गेल्याची तक्रार दिली. १७ मे रोजी सदर घटना घडली, त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही प्रकरणांचा वेगवान तपास सुरू झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक गठीत करण्यात आले. दरम्यान, जबरी चोरी प्रकरणातील एका आरोपीला अटक झाली असून आशिष भास्कर मोरे (१९)वर्ष असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दहा हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय वाहन चोरी प्रकरणातील स्विफ्ट डिझायर गाडी (किंमत ३ लाख ७५ हजार) जप्त ताब्यात घेण्यात आली.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी एलसीबीचे 'विशेष' पथक! 
गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. सदर पथकातर्फे दोन्ही गुन्ह्यांमधील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
यांनी केली कारवाई.. 
सदरची कामगिरी सुनिल कडासने पोलीस अधीक्षक बुलडाणा, अशोक थोरात-अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बी.बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि. अशोक एन. लांडे, पोउपनि. मोरे, पोहेकॉ. पंकजकुमार मेहेर, दिगंबर कपाटे, पोकों. दिपक वायाळ, चालक पोहेको. समाधान टेकाळे स्थानिक गुन्हे शाखेच्या बुलढाणा पथकाने पार पाडली आहे.