शेगाव ग्रामीण हद्दीत गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक; १०.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त! ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो ५६० ग्रॅम गांजा हस्तगत...
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात ‘मिशन परिवर्तन’ राबविण्यात येत आहे. गांजा व इतर अमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक, उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत.
दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी गोपनीय माहितीच्या आधारे शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेगाव ते खामगाव रोडवरील सुवर्ण शिवरात परिसरात पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने दोघे जण गांजा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला असता, हुसेन खान युसूफ खान (वय २५, रा. वॉर्ड क्रमांक १२, शेगाव) आणि आसिफ खान एजाज खान (वय २९, रा. ईदगाह प्लॉट, शेगाव) हे दोघे गांजा बाळगताना आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्याकडून २० किलो ५६० ग्रॅम गांजा, ज्याची किंमत १० लाख २६ हजार रुपये आहे, जप्त केला. याशिवाय एक मोपेड (क्रमांक MH-28-BY-3169), किंमत २५ हजार रुपये, एक कावासाकी बॉक्सर दुचाकी (क्रमांक MH-30-K-9884), किंमत २५ हजार रुपये आणि दोन मोबाईल, किंमत २० हजार रुपये, असा एकूण १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अमली औषधी द्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक-बुलढाणा अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक खामगांव पियुष जगताप यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. हेमंत ठाकरे बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि. यशोदा कणसे, पोहेकॉ. राजेंद्र टेकाळ, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, पोकॉ. मंगेश सनगाळे, अमोल वनारे, मनोज खरडे, सतीश नाटेकर, विकास देशमुख, पोहेकॉ. समाधान टेकाळे, पोकॉ. कैलास ठोंबरे यांनी पार पाडली...