समृद्धी महामार्गावर तिहेरी अपघात; अपघातग्रस्त वाहनाला मदत करणाऱ्यांनाही मागून ठोकले! आठ जखमी...
दोघांची प्रकृती गंभीर...
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २९३ (मुंबई कॉरिडोर) येथे हा अपघात झाला. याबाबतची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षातून मिळाल्यानंतर समृद्धी महामार्ग उपकेंद्र, सिंदखेड राजा येथील एपीआय इंगळे हे सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
प्राथमिकमाहितीनुसार, एमएच-१७-बीव्ही-००६१ क्रमांकाच्या नेक्सा कारचा चालक शशांक कृष्णा खेरणार (वय २५, रा. साकूर, ता. संगमनेर) याने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला. त्याला बाहेर काढण्याचे काम सुरू असतानाच एमएच-१४-एच-२१३८ क्रमांकाची औरा कार भरधाव वेगाने येऊन इनोव्हा गाडीला धडकली. त्यानंतर दोन्ही वाहने नेक्सा कारवर आदळल्याने अपघाताचे स्वरूप अधिक भीषण झाले.
या घटनेत मदतकार्य करणारे महामार्ग पोलीस आकाश मोहाडे, संतोष सोनुने, सचिन आंधळे तसेच अग्निशमन दलाचे परमेश्वर शिंदे हे किरकोळ जखमी झाले. मदतीसाठी थांबलेल्या ट्रकचालक मोईनोद्दीन मोहंमद शेख (रा. वसई) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. औरा कारमधील अमित बोंडे व तेजस वाघोरे हे देखील किरकोळ जखमी झाले. इनोव्हा चालक निजाम खान वकील खान हे अपघातातून सुखरूप बचावले.
अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलविण्यात आले. धडक देणाऱ्या औरा कारचा चालक अक्षय चनाप (रा. बार्शी टाकळी) हा अपघातानंतर फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.दरम्यान, अपघातात नुकसानग्रस्त झालेली तिन्ही वाहने रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.