अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर जप्त; महसूल पथकाची कारवाई! रेतीमाफीयांनो उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना हलक्यात घेऊ नका....

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अवैध रेती वाहतुकीवर प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेतीमाफियांना चांगलाच दणका दिला आहे. महसूल पथकाने चार ब्रास रेतीने भरलेला एक टिप्पर जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात जमा केला.

ही कारवाई १० एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. मेहुणा राजा शिवारातील खडकपूर्णा धरण कमान येथून कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्ती दरम्यान महसूल पथकाला विना क्रमांकाचा टिप्पर संशयास्पद स्थितीत आढळून आला.
पथकाने वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता, संबंधित वाहनाकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. यानंतर तात्काळ कारवाई करत टिप्पर ताब्यात घेण्यात आला आणि देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. नायब तहसीलदार सायली जाधव यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंडळाधिकारी विजय हिरवे व महसूल सेवक शरद काकडे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या राबवली. दरम्यान, प्रशासनाने अवैध रेती वाहतुकीविरोधात पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.