विहिरीवरील मोटर सुरू करताना काळाचा घाला! विजेचा जोरदार धक्का लागून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पळशी सुपो येथील घटना...
Sep 17, 2026, 10:45 IST
आसलगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घराजवळील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोटर सुरू करण्याच्या प्रयत्नात विजेचा जोरदार धक्का लागून २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पळशी सुपो येथे घडली. बादल जगदेव अंभोरे (वय २७, रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घराजवळील सार्वजनिक विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी घरातून विद्युत वायर विहिरीपर्यंत नेण्यात आली होती. बादल अंभोरे हे विहिरीवरील विद्युत बोर्डाच्या प्लगमध्ये वायर जोडत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेच्या धक्क्यामुळे ते बोर्डापासून दूर फेकले गेले.
घटना लक्षात येताच त्यांच्या आईसह गावातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. जखमी अवस्थेतील बादल यांना ऑटो रिक्षातून ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.या घटनेने पळशी सुपो परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सुरेंद्र सिद्धार्थ अंभोरे यांनी दिलेल्या माहितीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.