लग्नसोहळ्यात थरार! बॅग चोरीचा प्रयत्न उधळला; चाकूचा धाक दाखवत धमकी... असोला फाट्यावरील घटना
May 16, 2026, 10:25 IST
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील असोला फाटा परिसरातील शुभांगी लॉन्स येथे सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात मध्यरात्री अचानक गोंधळ उडाला. एका महिलेची बॅग चोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावताच आरोपींनी चक्क चाकूचा धाक दाखवत उपस्थितांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने लग्नसमारंभात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी राजू जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी (दि. १४) मध्यरात्री सुमारे १२.२३ वाजताच्या सुमारास शुभांगी लॉन्स येथे विवाह सोहळा सुरू असताना आरोपी हिरासिंग मोहनसिंग बावरे आणि संतोष बापू शिंदे यांनी संगनमत करून एका महिलेची बॅग चोरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, संशय आल्याने उपस्थित नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वतःची सुटका करण्यासाठी आरोपींनी अचानक चाकू बाहेर काढत “एखाद्याला जीवे मारून टाकू,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे लग्नसोहळ्यात एकच खळबळ उडाली. महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही काळासाठी कार्यक्रमात गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले.
घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस ठाणे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस हेड कॉन्स्टेबल गवई यांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.