प्रेमासाठी धमक्या; म्हणे माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझे फोटो होणाऱ्या नवऱ्याला पाठवतो! लग्न मोडल्यावर तरुणीने घेतला टोकाचा निर्णय!
जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील घटना..
Apr 6, 2026, 09:53 IST
आसलगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पळशी सुपो येथे एका २१ वर्षीय तरुणीचा मानसिक छळ करून तिला लग्नासाठी धमकावल्याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून आणि ठरलेले लग्न मोडल्याच्या धक्क्याने संबंधित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पळशी सुपो येथील गौरव पुरुषोत्तम खंडारे (वय २२) हा आरोपी गेल्या काही दिवसांपासून तरुणीला त्रास देत होता. “माझ्याशीच लग्न कर, अन्यथा तुझे आणि माझे फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवीन,” अशी धमकी तो वारंवार देत होता. या धमक्यांमुळे तरुणी मानसिक तणावाखाली होती. दरम्यान, आरोपीच्या धमक्यांमुळे तरुणीचे ठरलेले लग्न मोडले. शनिवार, ४ एप्रिल रोजी सासरच्या मंडळींनी घरी येऊन लग्नाचा संबंध तोडल्याचे स्पष्ट केले. या घटनेनंतर तरुणी पूर्णपणे खचून गेली. समाजात होणारी बदनामी आणि आरोपीचा वाढता छळ असह्य झाल्याने तिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मृत तरुणीचे काका ज्ञानेश्वर शामराव कोकाटे (वय ४७) यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गौरव पुरुषोत्तम खंडारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.