शेअर ट्रेडींगमधून पैसा कमावण्याचा मोह बाळगणाऱ्यांनो जरा जपून करा गुंतवणूक! खामगावच्या व्यवसायिकाला भामट्याने लावला १२ लाखांचा चुना! म्हणे शेअर मार्केटमधून कमाई करून देतो, वाचा इन्साईड स्टोरी ..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून नफा मिळवण्याचा मोह एका व्यावसायिकाला चांगलाच नडला. शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली अनोळखी व्यक्तीने तब्बल साडेबारा लाखांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने बुलडाणा सायबर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव येथील व्यावसायिक साकेत प्रेम सराफ (४० वर्ष) यांना काही दिवसांपूर्वी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला, मार्गन स्टेनले बिजनेस स्कूल या नावाने शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीसाठी एका अनोळखी व्यक्तीकडून त्यांना विचारणा करण्यात आली. यावेळी सदर शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीमध्ये मोठा नफा मिळत असल्याचे भासवून साकेत सराफ यांचा विश्वास संपादन करून अनोळखी व्यक्तीने असिस्टंट लिंडा नावाचे ॲप डाऊनलोड करावयाचे सांगितले. सराफ यांनी सदरचे ॲप डाऊनलोड केले. बहुसंख्य नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे सराफ यांनी सुद्धा शेअर ट्रेडिंग गुंतवणूकी मध्ये सहभाग घेतला. त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यामधून अज्ञात व्यक्तीच्या बँक खात्यात गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या टप्प्यात पैसे भरले. वेगवेगळ्या तारखेत एकूण १२ लाख ५५ हजार रुपेश शेअर म्हणून गुंतवणूक केले. परंतु त्यांना कुठलाही नफा मिळाला नाही, संबंधित व्यक्तीने शेअर मार्केटिंगच्या नावाखाली आपली फसवणूक केल्याची त्यांचे लक्षात आले. साकेत सराफ यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.