दुर्गामाता मंदिरातील देवीच्या मुकुटावर चोरट्यांचा डल्ला! २०० ग्रॅम चांदीचा मुकुट लंपास; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

 
 जळगाव जामोद :(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा ):शहरातील दुर्गामाता मंदिरात चोरीची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिरातील देवीच्या डोक्यावरील अंदाजे २०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याचे समोर आले आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद शहरातील दुर्गामाता मंदिरात देवीची नियमित पूजा-अर्चना व आरती केली जाते. मंदिरातील पूजा-अर्चना तसेच देखभालीची कामे प्रकाश देशपांडे महाराज पाहतात. याच मंदिरातील देवीच्या डोक्यावर असलेला चांदीचा मुकुट चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.१४ ऑगस्ट रोजी सायंकाळी रोहित गजानन कल्याणकर यांनी फोनद्वारे या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर प्रकरणाची माहिती पोलिसांकडे देण्यात आली.

या प्रकरणी अंबादास श्यामराव भाकरे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी १६ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेल्या चांदीच्या मुकुटाची किंमत किती आहे, याबाबत अधिक तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.दरम्यान, धार्मिक स्थळातील देवीचा चांदीचा मुकुट चोरीला गेल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांकडून परिसरातील संभाव्य पुरावे आणि घटनेशी संबंधित बाबींचा तपास केला जात आहे.