देऊळगाव महीत शेतकऱ्याच्या टीनशेडवर चोरट्यांचा डल्ला; शेती साहित्य, गहू अन् ३५ कोंबड्यांसह ₹२९ हजारांचा ऐवज लंपास
Jul 27, 2026, 13:36 IST
देऊळगाव राजा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव मही शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या टीनशेड आणि कुक्कुटपालन केंद्रावर डल्ला मारत शेतीसाठी उपयोगी साहित्य, गहू, कोंबड्या आणि चार्जिंग पंप असा सुमारे २९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ADVT
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय शिंगणे (वय ४४, व्यवसाय – शेती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना २५ जुलै रोजी सायंकाळी ५ ते २६ जुलै रोजी सकाळी ९.३० या कालावधीत देऊळगाव मही शिवारात घडली.
चोरट्यांनी टीनशेड व कुक्कुटपालन केंद्राचे कुलूप तसेच लोखंडी तार तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी ५० किलो वजनाच्या खताच्या पाच पोत्या, दोन क्विंटल गहू, विविध शेती अवजारे, लहान-मोठ्या सुमारे ३० ते ३५ कोंबड्या आणि एक चार्जिंग पंप असा एकूण ₹२९ हजारांचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.