सुटाळा खुर्दमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रकमेसह दोन दुचाकी लंपास...
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारस (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील गजानन दिनकरराव कुलकर्णी यांच्या घरातील कपाटात ठेवलेले ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील रिंगजोड, चांदीचे तीन छोटे ग्लास, दोन वाट्या आणि ५० हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
याशिवाय मंगेश मुकूल देशपांडे यांच्या घरातून २ हजार रुपये, तर रवि बबनराव बावणे यांच्या घरातून ३० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली. एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी आशीष संजय वेरूळकर यांच्या अंगणात उभी असलेली एमएच १९ सीसी ११५२ क्रमांकाची दुचाकी आणि श्रीकृष्ण दिनकर तायडे यांची एमएच २८ बीएल २४८२ क्रमांकाची दुचाकीही पळवून नेली.
३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेपासून १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने चोरट्यांनी परिसराची रेकी करून ही चोरी केली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५, ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार क्रमांक ११११ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.