जळगाव जामोदात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन घरांवर डल्ला, १.२३ लाखांची चोरी...
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर महादेव पुदाके वय ५९, रा. गणेश नगर, वाडी खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ जुलै रोजी रात्री १० ते १५ जुलै रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमधून ८० हजार रुपये रोख, सोन्याचे कानातील डोरले, अंगठी तसेच चांदीचे दागिने व इतर साहित्य असा १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याचवेळी शेजारी राहणारे एकनाथ बळीराम साळोकार यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांच्या घरातून लहान मुलांचे चांदीचे दागिने, एक ग्रॅम वजनाची सोन्याची ज्युती आणि इंडेन
कंपनीचा रिकामा गॅस सिलेंडर असा १८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. या दोन्ही घरफोड्यांमध्ये एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.