घाटपुरीत चोरट्यांचा हैदोस; श्री जगदंबा देवी मंदिरातील देवीचे मुकूट; चांदीचे डोळे व मंगळसूत्र लंपास !
Dec 26, 2025, 18:18 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरानजिकच्या घाटपुरी येथील श्री जगदंबा देवी संस्थान मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिराच्या मागील बाजूची लोखंडी खिडकी कापून चोरट्याने गणपती व देवीचे चांदीचे मुकूट, चांदीचे डोळे व मंगळसूत्र असा सुमारे ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही चोरी २४ डिसेंबरच्या रात्री झाल्याचे निष्पन्न झाले असून २५ डिसेंबर रोजी पहाटे हा प्रकार उघड झाला.
मंदिराचे पुजारी संजय शर्मा हे नेहमीप्रमाणे २५ डिसेंबर रोजी पहाटे मंदिरात गेले असता मंदिरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. पाहणी केली असता देवी व गणपतीचे चांदीचे मुकूट, चांदीचे डोळे व मंगळसूत्र चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
सदर चोरी करणारा चोरटा मंदिरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे चोरट्याची ओळख पटविणे शक्य झाले असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले होते.
चोरीची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अहेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास अधिकाऱ्यांना योग्य त्या तपासाच्या दिशेबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.