चोरट्यांचा संत गजानन महाराज मंदिरावर हात; चांदीचे छत्र, दानपेटीतील रक्कम व सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास! खामगावच्या घाटपुरीतील घटना

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील घाटपुरी रोडवरील सरस्वती नगर येथील संत गजानन महाराज मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मंदिरातील चांदीचे छत्र, दानपेटीतील रोख रक्कम आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केला असून, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती नगरातील संत गजानन महाराज मंदिराचे पुजारी तसेच विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष कचडूलाल छगनलाल पुरोहित (वय ६३, रा. सरस्वती नगर) यांनी खामगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी मंदिरातील अंदाजे ३०,००० रुपये किमतीचे चांदीचे छत्र, दोन दानपेट्यांमधील सुमारे ६,००० रुपये रोख रक्कम आणि सुमारे २,००० रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर चोरून नेला.

या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी डीव्हीआर चोरणे म्हणजे चोरीचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खामगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.