दुचाकीवर आले, पोलिस असल्याचे सांगितले अन् शेतकऱ्याची सोन्याची अंगठी घेऊन पसार झाले; बुलडाणा - धाड मार्गावरील प्रकार...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पोलिस असल्याची बतावणी करून दोन चोरट्यांनी एका शेतकऱ्याची सुमारे ३२ हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना बुलढाणा-धाड मार्गावरील चिखला शिवारात घडली. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

 

मिळालेल्या माहितीनुसार चिखला येथील विलास रामसिंग वाघ (वय ६५) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ते शेतीचे काम आटोपून पायी घरी जात असताना, बुलढाणा-धाड मार्गावरील दिगंबर पांडुरंग वाघ यांच्या शेताजवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. त्यापैकी एकाने स्वतःची ओळख 'पोलिस' अशी करून दिली. त्यानंतर अफू, चरस आणि गांजाबाबत तपासणी करायची असल्याचे सांगत दोघांनी त्यांच्या खिशांची झडती घेतली. खिशातील मोबाइल बाहेर काढून पुन्हा परत दिला. त्यानंतर 'सोन्याच्या अंगठीचा नंबर तपासायचा आहे,' असे सांगून हातातील अंगठी काढण्यास सांगितले. अंगठी सहज निघत नसल्याने एका आरोपीने ती स्वत काढून 'आता परत देतो,' असे सांगत ती बॅगेत ठेवली. त्यानंतर मोबाइल परत देऊन दोघे दुचाकीने पसार झाले.

फिर्यादी यांनी आरडाओरड केली-मात्र आरोपींनी वेगाने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकारात सुमारे पाच ग्रॅम वजनाची ३२ हजार ३५७ रुपये किमतीची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली या प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.