शेतकऱ्यांकडून कोटी रुपयांचा शेतमाल खरेदी केला अन् पैसे न देता तिघा 'बापलेकांनी' गेम केला! संतप्त शेतकऱ्यांनी सुरू केले उपोषण, खामगाव तालुक्यातील घटना.. 

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांकडून कोटी रुपयांचा शेतमाल खरेदी करून मोबदला न देताच तिघे बापलेक फरार झाल्याची घटना खामगाव तालुक्यात शहापूर येथे उघडकीस आली. दरम्यान, प्रकरणातील दोघा आरोपी बापलेकांवर अटकेचे कारवाई करण्यात आली. परंतु मुख्य 'सूत्रधार ' अजूनही फरार असल्याने पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात शहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ५ जून पासून शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. 
  प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील शहापूर येथील सुनील हरिदास पारखेडे (३८), गणेश हरिदास पारखेडे (३०), व हरिदास दौलत पारखेडे ( ६२) तिघेही बाप लेके गेल्या पाच - सहा वर्षांपासून शहापूर येथे शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीचा व्यवसाय करत होते. गेल्या पाच - सहा वर्षांपासून यांनी गावातील अनेक शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केला मात्र मागील चार महिन्यात त्यांनी शहापूर गावातील जवळपास ३३ शेतकऱ्यांकडून तुर,हरभरा, सोयाबीन यासारखे धान्य खरेदी केले होते. या सर्व धान्याची किंमत जवळपास एक कोटी, नऊ लाख रुपये इतकी आहे.धान्य खरेदी केल्यानंतर जेव्हा हे शेतकरी यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले तेव्हा पारखेड बापलेकांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तर दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाली शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनतर खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून १ एप्रिल २०२४ रोजी सुनील हरिदास पारखडे, गणेश हरिदास पारखेडे, हरिदास दौलत पारखेडे तिघेही ठगबाज बापलेका विरुद्ध तक्रार दाखल केली. यावेळी गणेश हरिदास पारखेडे, हरिदास दौलत पारखेडे या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी सुनील हरिदास पारखेडे याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले होते. यामधील गणेश हरिदास पारखेडे, हरिदास दौलत पारखेडे याना अटकेनंतर सध्या जामीन मिळाला आहे.
सध्या हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.मात्र अजूनही मुख्य आरोपी सुनील पारखेडे याला अटक करण्यात यंत्रनेला अपयश आले आहे. या प्रकरणात दोन महिने उलटूनही मुख्य आरोपी फरार असल्याने तपास यंत्रनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुख्य आरोपी सुनील पारखेडे याच्या विरुद्ध कठोर कारवाई करून त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी फसवणूक झालेले शेतकरी करीत आहेत. या करिता आर्थिक फसवणूक होवूनही न्याय मिळत नसल्याने शेतकरी बांधवांनी शहापूर येथील ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला ५ जून पासून सुरुवात केली आहे.