"कर्ज फेडीसाठी मजुरीचे पैसे मागितले... अन् २४ वर्षाच्या तरण्याबांड मुलानेच वडिलांच्या डोक्यात घातला दगड! जळगाव जामोद तालुक्यातील संतापजनक घटना...बापाची पोराविरुद्ध तक्रार
तक्रारीनुसार, आसलगाव येथील गजानन विश्वनाथ वानखडे (वय ५४) यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा श्याम गजानन वानखडे (वय २४) याला दारूचे व्यसन असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी रात्री सुमारे ८ वाजता गजानन वानखडे यांनी मुलगा श्याम याला, "घर बांधण्यासाठी घेतलेले कर्ज फेडायचे आहे, त्यामुळे तुझ्या मजुरीचे पैसे घरी दे," असे सांगितले. त्यावर श्यामने दुसऱ्या दिवशी पैसे देतो असे सांगून घराबाहेर गेला.
काही वेळाने तो दारूच्या नशेत परत आला आणि घरासमोर उभा राहून मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला. वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, "तू मला पैसे मागणारा कोण? मी तुला कोणतेही पैसे देणार नाही," असे म्हणत त्याने संतापाच्या भरात वडिलांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.
यावरही समाधान न झाल्याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून श्यामने वडिलांच्या डोक्याच्या बाजूला जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात गजानन वानखडे जखमी झाले. त्यांचा आरडाओरडा ऐकून गावातील नागरिक धावून आले आणि त्यांनी हस्तक्षेप करून पुढील अनर्थ टाळला.
घटनेनंतर जखमी गजानन वानखडे यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात धाव घेत मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेमुळे आसलगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून, दारूच्या व्यसनामुळे कुटुंबातील नातेसंबंध कसे उद्ध्वस्त होत आहेत, याचे आणखी एक विदारक उदाहरण समोर आले आहे.