खेळतांना झाला वाद,काही वेळातच रक्त सांडल..! लहान मुलांच्या किरकोळ वादाने घेतले हिंसक वळण; अखेर पोलिसांत गुन्हा,खामगावात  नेमकं घडलं तरी काय?

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह  वृत्तसेवा): शहरातील बर्डी प्लॉट परिसरात लहान मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर दोन कुटुंबांतील मोठ्या भांडणात होऊन दगडफेकीची घटना घडली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्डी प्लॉट परिसरात राहणारे जुनेदर जमीर शेख यांच्या घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलांमध्ये बुधवारी किरकोळ वाद झाला होता. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत हा वाद तात्पुरता मिटवला. मात्र, त्यानंतर सुमारे साडे सातच्या सुमारास रफीक शेख, आरिफ शेख आणि सिद्दीक शेख हे जुनेदर शेख यांच्या घरासमोर आले.
तक्रारीनुसार, या तिघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वाद अधिक चिघळत दगडफेक करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दगडफेकीत जुनेदर शेख यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच एका दहा वर्षीय मुलीच्या डाव्या हातालाही मार लागल्याची माहिती समोर आली आहे.याशिवाय, घरासमोर उभी असलेल्या मोटारसायकलीचेही नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले असून सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार विजय उमे करीत आहेत.