चांगल्याचा जमानाच नाही राव; समजवण्यासाठी गेलेल्या ड्रायव्हरलाच झोडपले ! चिखली बसस्थानकात राडा..  

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बस कंडक्टर सोबत वाद घालणाऱ्या प्रवाशाला समजवण्यासाठी गेलेल्या ड्रायव्हरला मारहाण झाल्याची घटना शनिवारी, चिखली बस स्थानकात घडली. चालकाच्या तक्रारीवरून एका विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 याबाबत बसचालक विनोद दत्तू वरपे यांनी चिखली पोलीसांत तक्रार दिली की, ते शनिवार, १८ मे रोजी चिखली ते धाड भडगाव मार्गे अश्या बस फेरीच्या कर्तव्यावर होते. दरम्यान, सकाळी १०:४५ वाजता चिखली बस स्थानकातून निघत असताना नवनाथ रसवंतीगृहाजवळ एका इसमाने हात दाखवून बस थांबवली. तसेच काही अंतरावर उभे असलेल्या दुसऱ्या प्रवाशाने देखील हात दाखविला होता. त्यामुळे दोन्ही प्रवाशांच्या मधोमध गाडी थांबवली. रसवंती जवळ उभा असलेला प्रवासी बस मध्ये शिरल्यानंतर वाहकासोबत वाद घालत होता. त्यामुळे त्याला समजवण्यासाठी चालक विनोद वरपे गेले असता त्या प्रवाशाने शिवीगाळ केली. शर्टाची कॉलर पकडून गाडीच्या खाली ओढले एवढेच नाही तर चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. काही वेळानंतर समजले की, अनिल दुर्योधन मोहिते रा. रुईखेड मायंबा असे त्या प्रवाश्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर शासकीय कामात अडथळा प्रकरणी चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.