सौर ऊर्जा प्रकल्पातून १.७५ लाखांचा साहित्यचोरीचा प्रकार उघडकीस!परडा शिवारातील कोटू पॉवर कंपनीच्या सौर प्रकल्पात चोरी; बोरखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : परडा शिवारातील सौर ऊर्जा प्रकल्पातून तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांहून अधिक किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोरखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २० जून रोजी सकाळच्या सुमारास समोर आली. कोटू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकीच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून चोरट्यांनी १३ अर्थिंग रॉड (किंमत ३९ हजार रुपये), स्ट्रिंग केबल (किंमत ४२ हजार ७५० रुपये) आणि चेस्ट्री व स्क्वेअर मीटर केबल (किंमत ९३ हजार ९३४ रुपये) असा एकूण १ लाख ७५ हजार ६८४ रुपयांचा माल चोरून नेला.या प्रकरणी कंपनीचे प्रतिनिधी अविनाश शांताराम तळोकार यांनी बोरखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.