खामगावच्या घाटपुरी मंदिरातील चोरीचा ५ महिन्यांनंतर उलगडा; बुलढाणा LCB ने अकोल्याच्या अमोल तेलगोटेला ठोकल्या बेड्या, ३.२० लाखांची सोन्याची लगड जप्त..

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या खामगावच्या प्रसिद्ध जगदंबा देवी संस्थान, घाटपुरी मंदिरात गेल्या वर्षी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अकोला जिल्ह्यातील रिधोरा येथील सराईत आरोपी अमोल काशीराम तेलगोटे (वय ३९) याला अटक करून त्याच्याकडून २० ग्रॅम २० मिली वजनाची, ३ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.
२४ डिसेंबर २०२५ च्या रात्री ८ ते २५ डिसेंबर २०२५ च्या पहाटे ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने घाटपुरी मंदिराच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला होता. त्याने देवी व गणपतीच्या मूर्तींवरील ७३,००० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. 

जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे व गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अमोल तेलगोटेचा माग काढला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

वैद्यकीय तपासणीनंतर शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला जप्त मुद्देमालासह शिवाजीनगर पोलीस स्टेशन, खामगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कार्यवाही

जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र अंभोरे, मपोअं वनिता शिंगणे, पो.कॉ.अमोल शेजोळ, अजिस परसुवाले, मनोज खर्डे, शिवानंद हेलगे आणि कैलास ठोंबरे यांच्या पथकाने केली.