शेतातून परतणाऱ्या तरुण मजुराचा पाय घसरला; वान नदीपात्रात बुडून मृत्यू,खळद येथील घटना 

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतातून काम करून परतत असताना तरुण मजुराचा पाय घसरून तो वान नदीपात्रात पडला आणि बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. विठ्ठल महादेव आमझरे (वय२४) असे मृतकाचे नाव आहे.

तालुक्यातील खळद येथील विठ्ठल महादेव आमझरे हा अनंता बिहाडे यांच्या शेतात मजुरीसाठी गेला होता. रात्री घरी परतत असताना तोल जाऊन पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नातेवाइकांनी तत्काळ शोधाशोध सुरू केली, मात्र तो सापडला नाही.
दरम्यान, १२ सप्टेंबरच्या सकाळी पातुर्डा गावाजवळील पुलाजवळ नदीपात्रात विठ्ठलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृतकाच्या चुलत भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.