पिस्तूल व चाकुचा धाक दसखवून महिलेला लुटले; सिंदखेडराजा येथील घटना..!

 
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना चोरट्यांनी पिस्तूल व चाकुचा धाक दसखवून त्यांच्या अंगावरील सोणे-चांदीचे दागिने लुटून पोबारा केल्याची घटना काल १२ ऑगस्टच्या सकाळी सहा वाजता दरम्यान शहरातील जालना रोडवर घडली.
जालना रोडवरील मोठा महादेव मंदिर येथे पूजेसाठी सिंदखेडराजा येथील आसराबाई मुंडे ह्या दर्शनासाठी जात असतांना जालना रोडवरुन समोरून एक चारचाकी वाहन त्यांच्यासमोर येवून थांबले. चोरट्यांनी महिलांना अडवून त्यांना चाकू व पिस्तूलचा धाक दाखविला. आसराबाई मुंडे यांच्या नाकातील व कानातील सोने ओरबडून काढले. आरडाओरड केल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी आसराबाई मुंडे यांच्या फिर्यादीवरुन सिंदखेडराजा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.