हळद लागल्यावर नवरी बॉयफ्रेंडसोबत पळाली, पण नवरदेवाला ऐनवेळी दुसरी मिळाली!
गावातल्याच मुलीशी बांधली लगीनगाठ; सुजाण नागरिकांच्या पुढाकाराने लागला मेहकर तालुक्यात अनोखा विवाह!
एका क्षणी दुःख आणि दुसऱ्या क्षणी आनंदाचा प्रसंग... सिनेमात शोभेल अशी कहाणी प्रत्यक्षात घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात या अनोख्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे.मेहकर तालुक्यातील एका गावातील मुलाचे लग्न चिखली तालुक्यातील मुलीशी जुळले. दोन महिन्यांपूर्वी साक्षगंध झाला होता.भावी संसाराची स्वप्ने रंगवत दोघेही मोबाइलवर बोलू लागले. दरम्यान, १३ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता विवाह लागणार होता. नवरदेवाने हळद लावली, बाशिंग बांधले. लग्नाची सर्व तयारी झाली. लग्नाचा बँड बाजाही तयार होताच. सकाळी वऱ्हाड निघणार, तेवढ्यात वधू पक्षाकडून 'थोडं थांबा, वऱ्हाड नंतर काढा' असा संदेश मिळाला. काय झाले? याची खोलवर चौकशी केली असता वधू दुसऱ्या युवकासोबत पळून गेल्याचे समजले. ही धक्कादायक बातमी ऐकून नवरदेवासह वर पक्षाकडील लोकांना धक्का बसला.
ग्रामस्थांच्या साक्षीने घातल्या वरमाला..!
नवरी पळाल्याचे समजल्यानंतर वऱ्हाड निघालेच नाही. नवरा मुलगा सुशिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभा असल्याने अनेकांनी असे घडायला नको होते म्हणत हळहळ व्यक्त केली. दरम्यान, गावातील काही सुजाण नागरिकांनी पुढाकार घेत या मुलाची संसारवेल फुलवण्याचे ठरले. विचार विनिमय करून त्याच दिवसाच्या तारखेत लग्न लावण्याचे ठरवण्यात आले. जातीतीलच एक मुलगी शोधण्यात आली. तिचा व तिच्या घरच्यांचा विचार घेण्यात आला. होकार मिळाल्यानंतर १३ मार्चला सायंकाळी सात वाजता गावकऱ्यांच्या साक्षीने दोघांचे लग्न लागले.