मंगल कार्यालयात लग्नाची धामधूम सुरु होती; नवरदेवाच्या खोलीत मात्र भलतंच काही घडलं, अर्ध्या तासात मागचा दरवाजा अन्.... बिबी येथील धक्कादायक घटना..
Dec 16, 2024, 21:49 IST
बीबी(श्रीकृष्ण पंधे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय...घटना लोणार तालुक्यातील बिबी येथील आहे..बिबी येथील मंगल कार्यालयात लग्नाची धामधूम सुरु होती..वाशिम जिल्ह्यातील उकळी पेन येथील वरपक्षाची वऱ्हाडी मंडळी बिबी येथे आलेली होती..सगळ काही सुरळीत सुरू होत..बाहेर नवरदेवाची वाजत –गाजत मिरवणूक निघाली होती..मात्र तिकडे नवरदेवाच्या खोलीवर एका भामट्याची नजर होती..सगळी मंडळी बाहेर असताना नवरदेवाच्या खोलीचा मागचा दरवाजा एका भामट्याने तोडला अन् त्या खोलीतून एक पर्स अन् त्यातील ७ ते ८ हजार रुपये चोरुन नेले..
घटना १५ डिसेंबर रोजीची आहे. नवरदेवाचा भाऊ गजानन उद्धवराव लांडे (३४) यांनी याबाबत बिबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नवरदेवाची खोली बंद करून नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी बाहेरच्या परिसरात गेले. त्यानंतर ५ वाजता गजानन लांडे पुन्हा खोलीत गेले असता मंगल कार्यालयाच्या त्या खोलीचा दरवाजा त्यांना तुटलेला दिसला. ७ ते ८ हजार रुपयांची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी अज्ञात आरोपी वृद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच ठाणेदार संदीप पाटील , पोलीस उपनिरीक्षक गजानन बास्टेवाड, पोहेकॉ दिनेश चव्हाण , अर्जुन सांगळे, अरुण सानप यांनी घटनास्थळ गाठून तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे एका चोरट्याला पकडले. आधी उडवा उडवी ची उत्तरे देणाऱ्या त्या संशयीत आणि नंतर गुन्ह्याची कबुली दिली, सोबत गुन्हा करण्यासाठी एका मित्राची मदत घेतल्याचेही त्याने सांगितले. सदर माहितीवरून पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेला ७८०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला. राहुल काळे (३०) आणि आनंद लक्ष्मण गाढवे (३७) अशी चोरट्यांची नावे आहेत.