ट्रकवाला जास्त हुशार निघाला! "एलसीबी" वाले त्याहून हुशार! नाफेड केंद्रातून हरबरा घेतला, बाजार समितीत न्यायचा होता, पण अख्खा ट्रक गायब केला...३०० सीसीटीव्ही तपासले अन्... मलकापूरची घटना

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लालमती येथील नाफेड केंद्रातून हरबरा मलकापूरच्या बाजार समितीत न्यायचा होता. नाफेड केंद्राच्या अध्यक्षांनी एक ट्रान्सपोर्ट कंपनीतून एक ट्रक बोलावला, रीतसर भाडे ठरवून २७० क्विंटल हरबरा ट्रक मध्ये भरला. माल कुठे उतरवायचा हेही ड्रायव्हरला सांगितले..अर्थात संपूर्ण देशभरात ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या माध्यमातून असाच विश्वासाने व्यवहार होतो..मात्र या प्रकरणात ट्रकवाल्याने चांगलाच विश्वासघात केला..ट्रकमध्ये भरलेला माल मलकापूरच्या बाजार समितीत पोहचलाच नाही, अख्खा ट्रक ट्रकवाल्याने गायब केला...इकडे नाफेड केंद्राचे अध्यक्ष हैराण झाले..त्यांनी मदतीसाठी धामणगाव बढे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली..तक्रारीची  गंभीर दखल घेत एसपी निलेश तांबे यांनी सुनील अंबुलकरांच्या नेतृत्वातील एलसीबी ला तपासाच्या सूचना दिल्या.. एलसीबी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला अनुभव पणाला लावला.. एक दोन नव्हे तर तब्बल ३०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, त्यांची व्यवस्थित लिंक जोडली.. अन् अखेर एलसीबी हरभरा चोरणाऱ्या त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचलीच...
धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये  भारतीय न्याय संहिता कलम ३१६(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार राजेंद्र आनंदराव जंगले (वय ५२, रा. थड, ता. मोताळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ मे २०२६ रोजी २७० क्विंटल हरभरा घेऊन जाणारा ट्रक बाजार समिती, मलकापूर येथे न पोहोचता अपहार करण्यात आला होता. या मालाची किंमत सुमारे १५ लाख ८६ हजार २५० रुपये होती.

प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण तसेच परिसरातील सुमारे ३०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपींना मलकापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख अमीन शेख जमील (वय ३३), शेख समीर शेख सलीम (वय २७), शेख सादिक शेख नुरमोहमंद (वय २४), मो. मुस्कीन मो. मुशीर शेख (वय ३४) आणि सोहेल खान उर्फ शोपब युनुस खान (वय २३) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी हे मलकापूर येथील रहिवासी आहेत.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ११८.३५ क्विंटल हरभरा, ३ लाख रुपये रोख रक्कम आणि एमएच ४३ यू ५२९० क्रमांकाचा ट्रक असा एकूण १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांनी पार पडली कार्यवाही 

पोलीस अधीक्षक, 
निलेश तांबे,अपर पोलीस अधीक्षक, अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, श्रेणीक लोढा, यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, विजय पैठणे, पोकॉ गजानन गोरले, चासफौ विकास देशमुख, निवृत्ती पुंड, पोहेकॉ राजु आडवे यांनी पार पडली