टायर फुटला अन् कार थेट उलटली! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, आठ जण जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, राजनांदगाव (छत्तीसगड) येथील दहा जण पुण्याहून नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते. समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरच्या चॅनेल क्रमांक ३३४.३ जवळ, दुसरखेडाजवळ त्यांच्या कारचा अचानक टायर फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार महामार्गावर उलटली. या अपघातात अमन साहू (वय २५) यांना गंभीर दुखापत झाली. तसेच तिकेस बंदे, रवी साहू, यश साहू, देवेश साहू, हेमंत विश्वकर्मा, वासू साहू, विकी साहू, किशन विश्वकर्मा आणि नवीन साहू हे जखमी झाल्याची माहिती आहे. गंभीर जखमी अमन साहू यांच्यासह इतर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अमन साहू यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
महामार्ग पोलिसांची तत्परता
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी हलविण्यासह मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमींना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले.
दरम्यान, अपघातग्रस्त कार महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनेची नोंद किनगाव राजा पोलिसांनी घेतली असून, या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.अचानक टायर फुटल्याने घडलेल्या या दुर्घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.