"शेंबा येथील इलेक्ट्रिक दुकान फोडणारा चोरटा LCB च्या जाळ्यात; मलकापुरातून अटक"
Jun 3, 2026, 10:29 IST
(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील शेंबा येथील सिद्धेश्वर इलेक्ट्रिक व रिवाइंडिंग दुकानाचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने मलकापूर शहरातून अटक केली आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर पोलिसांच्या तांत्रिक तपासाला यश आले असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी तांदुळवाडी, ता.नांदुरा येथील ज्ञानेश्वर पंढरी व्यवहारे (४५) यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. २१ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजेपासून ते २२ नोव्हेंबरच्या सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान शेंबा येथील त्यांच्या दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने वाकवून आत प्रवेश केला. मात्र दुकानातील कॅमेऱ्याचा सायरन वाजल्याने आरोपी काहीही चोरी न करता पळून गेला होता.
याप्रकरणी बोराखेडी पो.स्टे. येथे गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. पो.नि. आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. १ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, सदर चोरीचा प्रयत्न मलकापूर येथील इसमाने केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे सपोनि. यशोदा कणसे यांच्या पथकाने मलकापूर टाऊन येथील सायकलपुरा भागात छापा टाकला. पोलिसांनी आरोपी शेख साबीर शेख अहमद (वय ३२ वर्षे, रा. सायकलपुरा, मलकापूर जि. बुलडाणा) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी शेंबा येथील सिद्धेश्वर इलेक्ट्रिक दुकानात चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कारवाईसाठी बोराखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कार्यवाही
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.आशिष रोही, सपोनि. यशोदा कणसे, पोहेकॉ. विजय वारुळे, अनुपकुमार मेहेर, अमोल वनारे, सतीश नाटेकर, चापोहेकॉ. समाधान टेकाळे व पो.कॉ. कैलास ठोंबरे (तांत्रिक विश्लेषण विभाग) यांच्या पथकाने ही कारवाई केली.