दानपेटी चोरीचा अवघ्या दोन तासांत छडा; आरोपी गजाआड, दानपेटीसह १००% मुद्देमाल हस्तगत!
Jul 28, 2026, 10:28 IST
धाड (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): धामणगाव येथील श्री गजानन महाराज–साईबाबा संस्थान मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी धाड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या दोन तासांत गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली दानपेटी आणि रोख रक्कम असा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी समाधान छगन पायधन (वय ५९, रा. धामणगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाड पोलिस ठाण्यात २७ जुलै रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्हे शोध पथकाला कामाला लावले.
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नीलेश गणेश महाले (वय ३३, रा. धामणगाव) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत चोरीस गेलेली सुमारे ₹१,५०० किमतीची लोखंडी दानपेटी आणि ₹६,००० रोख रक्कम, असा एकूण ₹७,५०० किमतीचा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई धाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर लोखंडे, युवराज मुळे तसेच गुन्हे शोध पथकाने केली.