मलकापुरात "गबऱ्या" ची दहशत! चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी हिसकावली...

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापुरात आता गावगुंडांची दहशत सुरू झालेली आहे. मलकापुरात सातत्याने छोटे-मोठे गुन्हे होत आहेत.मागील महिन्यात जिल्हा हादरवून सोडणारे दोन खुनाचे गुन्हे मलकापुरात घडले. दरम्यान आता "गबऱ्या" नावाच्या गावगुंड मलकापुरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. एका युवकाला चाकूचा धाक दाखवत त्याने सोन्याची साखळी लंपास केली आहे. विशेष म्हणजे हा "गबऱ्या" अल्पवयीन मुलांना देखील गुन्हेगारी क्षेत्रामध्ये उडत आहे. सोन्याची साखळी लुटताना त्याच्यासोबत एक अल्पवयीन सहकारी देखील होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. गबऱ्या मात्र अद्याप अजूनही फरार आहे. 
 पुरुषोत्तम विष्णू कुटे रा.नांदुरा हा युवक आपली दुचाकी घेऊन मलकापूर शहरातील आपला पेट्रोल पंपाजवळ उभा असतांना, दोन जणांनी त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून युवकाला मारहाण करण्यात आले. त्यानंतर दोन्हीही आरोपी घटनास्थळावर पसार झाले. याप्रकरणी पुरुषोत्तम काटे याने मलकापूर शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आपली चक्रे फिरवून फरार असलेल्या दोन आरोपी पैकी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर अरविंद उर्फ गबऱ्या सोळंके हा अजूनही फरार आहे.