अल्पवयीन मुलाला लागला चोरीचा नाद! शेगावात मोटरसायकली चोरल्या, भुसावळ मध्येही घातला होता धुमाकूळ! बुलडाणा LCB ने केला बंदोबस्त....
Jun 7, 2025, 08:50 IST
बुलढाणा (बुलडाणव लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव शहरात सध्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच, स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या चोख कारवाईत एक विधी संघर्षित बालकाला अटक करून तब्बल पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण २,९०,००० रुपये किमतीच्या या वाहनांची चोरी उघडकीस आली असून, शेगाव शहरातील तीन आणि भुसावळ येथील दोन असे एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
शेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीप्रकरणी अप.क्र. 284/2025 कलम 303(2) भा.दं.वि. अन्वये गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व बी. बी. महामुनी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि. अशोक लांडे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व बारकाईने निरीक्षण करून एका १७ वर्षीय बालकाला नांदुरा येथून ताब्यात घेतले.
या बालकाच्या कबुलीनंतर पोलिसांनी सिल्व्हर रंगाची अॅक्टीव्हा – ₹६०,०००/, HF डिलक्स – ₹५०,०००/, काळ्या रंगाची अॅक्टीव्ह (MH-28CA-3244) – ₹६०,०००/,पांढऱ्या रंगाची अॅक्सेस १२५ (MH-19-EJ-0742) – ₹६०,०००/,निळ्या रंगाची अॅक्सेस १२५ (MH-19-DR-3908) – ₹६०,०००/- अशा एकूण पाच मोटरसायकली जप्त केल्या.
एकूण मुद्देमालाची किंमत ₹२,९०,०००/- इतकी आहे.
प्राथमिक चौकशीत या विधी संघर्षित बालकाने शेगाव शहरातील तीन आणि जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याने दुकान, बसस्थानक, बियर बार व मंदिर परिसरात चावी लावून उभ्या असलेल्या दुचाकी ओळखून त्यांची चोरी केली, असे पोलिसांनी सांगितले.
या कामगिरीत पोउपनि. पंकज सपकाळे, पोहेकॉ. रघुनाथ जाधव, गणेश पाटील, पोकॉ. गणेश वाघ, विक्रांत इंगळे, चापोकॉ. निवृत्ती पूंड यांनी सक्रिय सहभाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास शेगाव शहर पोलीस ठाणे करीत असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच अटकेत असलेल्या बालकाने आणखी किती गुन्हे केले आहेत, याचा तपासही सुरु आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी मोटारसायकली सुरक्षित ठिकाणी पार्क कराव्यात व चोरट्यांपासून सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.