समृद्धीवर अपघातांची मालिका थांबता थांबेना ! चालकाचे नियंत्रण सुटले अन्.. 

 
दुसरबीड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून नावारूपास आलेला समृद्धी महामार्ग अनेकांसाठी काळ ठरत आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. गेल्या महिन्याभरापासून अपघातांच्या अनेक घटना घडून गेल्या आहेत. यात दुर्दैवाने कित्येकाचे प्राण गेलेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. आज १८ जूनच्या सकाळी पुन्हा समृद्धी महामार्गावरील दुसरबीड टोलनाक्यानजीक भरधाव खाजगी बसने समोरील ट्रकला धडक दिली. यात लक्झरी चालकासह दोघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, लक्झरी बसचा समोरील भाग अक्षरशः चुरडा झाला आहे.  
प्राप्त माहितीनुसार, अंबारी कंपनीची, एम एच ३७ टी ८००० क्रमांकाची खाजगी (लक्झरी) बस २० प्रवाशांना घेऊन पुसदकडे जात होती. दरम्यान, नागपूर कॉरिडोवरील दुसरबीड टोलनाक्यानजीक बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे समोरून येणाऱ्या ट्रकला बस धडकली. बसचा वेग जास्त असल्याने धडक अतिशय जबर आणि थरकाप उडवणारी होती. बसचालक महादेव मोतीराम राऊत हे गंभीर जखमी झाले असून वाहक ज्ञानेश्वर वानखेडे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, समृद्धी महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुरक्षारक्षक जवानांनी जखमींना रुग्णवाहिकेतून बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी महामार्गावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. अपघात ग्रस्त वाहने, एका बाजूने लावून पोलिसांनी रस्ता खुला केला होता.