अपघाताची मालिका थांबेना! समृद्धी महामार्गावर भीषण धडक; आई-वडिलांचा जागीच मृत्यू, दोन मुले व चालक गंभीर......

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):देशातील महत्त्वाकांक्षी आणि अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी (२३ जून) सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात भीषण अपघात घडला. भरधाव फॉर्च्यूनर कारने मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची दोन मुले आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेज क्रमांक ३२६.५ येथे, किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला.

या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर (वय ५२) आणि त्यांच्या पत्नी गुलसितानबी सय्यद आसिफ (वय ४५) यांचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला. तर चालक शेख साजिद शेख फरीद, मुलगी नबा सय्यद आसिफ (वय १८) आणि मुलगा सय्यद अजब माज सय्यद आसिफ (वय २५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर जखमींना तत्काळ सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. मृत दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सोळंके यांच्यासह आराख, राठोड, चौधरी, शेख नासिर आणि बारगजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात नागपूरहून मुंबईकडे जात असलेल्या एनएल-०१-एडी-४९८१ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकला एमएच-२०-एचएन-६७६८ क्रमांकाच्या फॉर्च्यूनर कारने मागून धडक दिल्याचे समोर आले आहे.

ट्रक चालक मोहम्मद इजराऊल हक (रा. झारखंड) याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो नागपूरहून मुंबईकडे जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या फॉर्च्यूनरने ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातानंतर दोन्ही वाहने महामार्गाच्या मध्य लेनमध्ये उभी होती. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघातग्रस्त वाहने घटनास्थळावरून हटवून दुसरबीड टोलनाक्यावर नेण्यात आली.
समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.