बदला घेण्याची भावना त्याला स्वस्थ बसू देत नव्हती !२८ वर्षानंतर घेतला वडिलांच्या खुनाचा बदला! गळा चिरून हत्या; जळगाव जामोद तालुक्यातील खळबळजनक घटना 

 
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २८ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा खून झाला होता. मात्र एक दिवस बदला घेईलच हे त्याने मनाशी ठरवले होते. संतापाची आग त्याच्या मनात धुमसत होती..अखेर त्याने संधी हेरली..वडिलांचा खून करणाऱ्याचा २८ वर्षानंतर बदला घेतलाच..वडिलांच्या खुन्याची २८ वर्षानंतर गळा चिरून हत्या केली. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
  पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनगाव येथील शेषराव सखाराम दामोदर (४२) याच्या वडिलांचा १९९५ मध्ये खून झाला होता. त्यावेळी शेषराव हा अवघ्या १४ वर्षांचा होता. याप्रकरणी खून करणाऱ्या मोतीराम मारोती धुळे याला पोलिसांना अटक केली होती. २००२ मध्ये मोतीराम धुळे शिक्षा भोगून गावात परतला व सामान्य जीवन जगू लागला होता.
मात्र शेषराव दामोधर यांच्या मनात वडिलांचा खून करणाऱ्या मोतीराम बद्दल बदल्याची भावना होती. गुरुवारी रात्री संधी साधून शेषराव ने मोतीराम च्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केले आणि त्याची हत्या केली. वडीलांच्या खुनाचा बदला २८ वर्षानंतर शेषराव याने घेतला. याबाबतची तक्रार मोतीराम धुळे याचा पुतण्या रवींद धुळे याने पोलीस स्टेशनला दिली असून तक्रारीवरून पोलिसांनी शेषराव विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.