रेती माफियांची हिम्मत वाढली! तलाठी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; आरोपीला अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, महसूल कर्मचाऱ्यांवर थेट जीवघेणे हल्ले होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. अशाच गंभीर घटनेत बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे मंगळवारी (दि. २०) दुपारी १२.३० वाजता अवैध रेती वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या तलाठी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे जिल्ह्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रायपूर येथील तलाठी कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या ग्राम महसूल अधिकारी उषा संतोष देशमुख व त्यांच्या सहकारी ग्राम महसूल सेवक भाग्यशाली गजेंद्र गिरी यांनी विना नंबरचा, निळ्या रंगाचा न्यू हॉलंड ३६०० कंपनीचा रेतीने भरलेला ट्रॅक्टर संशयावरून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन न थांबवता दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर आणून घटनास्थळावरून पळ काढला.

तपासाअंती ट्रॅक्टर चालकाचे नाव ज्ञानेश्वर मुरडकर (रा. रायपूर) असल्याचे निष्पन्न झाले. महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत संबंधित ट्रॅक्टर जप्त केला असून त्यातील १ ब्रास रेती (३ हजार रुपये) व ३ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, असा एकूण ३ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२१, ३०३(२) व सहकलम ४८ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपीस अटक न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

अटक न झाल्यास जिल्हाभर आंदोलनाचा इशारा

या घटनेचा तीव्र निषेध करत पटवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ राजपूत यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
“शासकीय कर्तव्य बजावत असताना तलाठी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न हा अतिशय गंभीर प्रकार आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा पटवारी संघटनेच्यावतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

दरम्यान, रेती माफियांविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सातत्याने हल्ल्याचे प्रकार घडत असताना प्रशासन आणि पोलिसांची भूमिका काय? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.