नांदुऱ्यात “सैराट”ची ची पुनरावृत्ती; प्रेमविवाहाच्या रागातून जावयाच्या घरावर हल्ला.. कोयते, रॉड, घेऊन आले अन्....

 
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रेमविवाहाच्या रागातून उफाळलेला संताप थेट हिंसाचारात बदलल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पिंप्री अढाव येथे ११ एप्रिल रोजी घडली. जणू काही “सैराट” चित्रपटातील प्रसंग वास्तवात उतरल्याप्रमाणे, सासरच्या मंडळींनी जावयाच्या घरी जाऊन हल्ला केला . या प्राणघातक हल्ल्यात जावयाचा भाऊ गंभीर जखमी झाला असून घरातील महिलांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामू गजानन अढाव (वय २२) याने मे २०२५ मध्ये अंजली गायकवाड हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला हे लग्न गुप्त ठेवण्यात आले होते; मात्र नंतर दोघेही एकत्र राहत होते. शनिवारी (दि. ११) दुपारी सुमारे ४ वाजता अंजलीचे वडील व नातेवाईक पिंप्री अढाव येथे आले होते.

दरम्यान, दोन्ही कुटुंबीयांमध्ये चर्चा सुरू असताना अचानक मुलीच्या नातेवाईकांनी घरासमोर जमाव गोळा केला. त्यांनी अंजलीला बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी रामू व त्याची पत्नी घरात आश्रय घेत असताना बाहेर असलेल्या कुटुंबीयांवर संतप्त जमावाने हल्ला चढवला.

रामूचा भाऊ विठ्ठल अढाव हा जीव वाचवण्यासाठी शेताकडे पळत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. दुर्गेश धनोकार याने लोखंडी रॉडने, आदित्य ढंगे याने दगडाने, तर विशाल ढंगे याने कोयत्याने डोक्यावर वार करत त्याला गंभीर जखमी केले.

जखमी विठ्ठल अढाव याच्यावर सध्या मलकापूर येथे उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी शंकर श्रीकृष्ण ढंगे, विनोद श्रीकृष्ण ढंगे, आदित्य शंकर ढंगे, विशाल मुरलीधर ढंगे व दुर्गेश गणेश धनोकार या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार नवाज शेख करीत आहेत.