लोणारच्या कमळजा माता मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; भक्तांचा रस्ता रोको; पुरातत्त्व व पर्यटन विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे; नवरात्रीपूर्वी काम सुरू न झाल्यास तीव्र उग्र इशारा...
सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने कमळजा माता मंदिर पाण्याने वेढले गेले आहे. त्यामुळे मंदिराच्या प्राचीन वास्तूला धोका निर्माण झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनाची तीव्रता पाहता तहसीलदारांसह पुरातत्त्व विभाग (ASI) आणि पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने आंदोलनस्थळी दाखल झाले.
यावेळी भक्तांनी प्रशासनासमोर आपल्या मागण्या ठामपणे मांडल्या. कमळजा माता मंदिर तातडीने सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच सरोवरात येणाऱ्या गोड्या पाण्याच्या प्रवाहांचा वैज्ञानिक अभ्यास करून वाढत्या पाणीपातळीवर तातडीने तांत्रिक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
केवळ बैठका आणि अभ्यासाच्या नावाखाली वेळकाढूपणा न करता प्रशासनाने नेमके काय करणार, कधी करणार आणि कोणत्या विभागामार्फत करणार, याची स्पष्ट माहिती आणि वेळबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही भक्तांनी केली.
तसेच तहसील प्रशासन, पुरातत्त्व विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग आणि तज्ज्ञांची संयुक्त कृती यंत्रणा तयार करून कमळजा माता मंदिरासह सरोवरातील पाण्याखाली गेलेल्या इतर प्राचीन मंदिरांचेही संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. हा केवळ एका मंदिराच्या संरक्षणाचा प्रश्न नसून लोणारच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनाचा प्रश्न आहे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
अखेर अधिकाऱ्यांनी मंदिराच्या संरक्षणासाठी आवश्यक ती कायदेशीर व तांत्रिक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर भक्तांनी रस्ता रोको आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, प्रशासनाच्या आश्वासनानंतरही भक्तांमधील नाराजी कायम आहे.
“प्रशासनाने केवळ आश्वासन देऊन आंदोलन मागे घ्यायला लावले आणि नवरात्रीपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही, तर यापुढील आंदोलनाची दिशा आणि तीव्रता अधिक आक्रमक असेल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.