पोलिसांनी जंगजंग पछाडले पण असोला शिवारात जाळून मारलेल्या "त्या" विवाहितेची ओळख पटेना! पोलिसांनी हात टेकले; जाहीर केले ५० हजाराचे बक्षीस

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २३ जानेवारीला अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील असोला शिवारात एका विवाहितेचा अर्धवट जळालेला व नग्नअवस्थेत असलेला मृतदेह आढळला होता. त्या अनोळखी मृतक महिलेची ओळख पटविण्यासाठी अंढेरा पोलिसांसह विविध शाखांनी जंगजंग पछाडले मात्र ६ दिवस उलटून देखील तिची ओळख पटलीच नाही.यामुळे अखेरीस पोलीस विभागाने त्या दुर्देवी महिलेची ओळख पटविणे व माहिती देण्यासाठी तब्बल ५० हजारांचे बक्षीस जाहिर केले आहे. 
२३ जानेवारीला चिखली देऊळगाव राजा मार्गावरील हॉटेल राजवाडा मागे एका मृतक महिलेचा नग्न मृतदेह आढळून आला होता. तिचा गळा आवळून व डोक्यावर दगडाचे वार करून हत्या करण्यात आली होती. त्याआधी मारेकऱ्याने तिच्यावर बलात्कार देखील केला. धूर्त मारेकऱ्याने तिची ओळख पटू नये व पुरावा नष्ट करण्यासाठी तिला
 जाळन्याचा प्रयत्न केला. मात्र ती अर्धवट जळाली. प्रकरणी पोलिसांनी कलम ३०२, २०१( पुरावा नष्ट करणे) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
  दरम्यान तिची ओळख पटविण्यासाठी अंढेरा पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जंग जंग पछाडले. मात्र सहा दिवस उलटल्यावरही तिची ओळख न पटल्याने अखेर पोलिसांनी हात टेकले.या महिलेची ओळख पटविणे व माहिती देण्यासाठी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले. नागरिकांनी एलसीबी ९८२२०५७९३६, पोलीस नियंत्रण कक्ष ०७२६२-२४२४००, एपीआय विकास पाटील ९४०४८०३३३६ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मृत महिला अंदाजे २० ते २५ वर्षांची आहे. तिच्या हातावर दिल चे चित्र व त्यात s k अशी अक्षरे आहेत. हाताला लाल धागा बांधलेला आहे.