वैद्यकीय प्रवेशाचे आमिष; 13 लाख ११ हजारांनी केली फसवणूक
घाटबोरीतील कुटुंबाची आर्थिक लूट; डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करून देतो, असे आमिष दाखवून तब्बल १३ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम घाटबोरी येथे उघडकीस आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटबोरी येथील प्रकाश पुंजाजी पाखरे यांना त्यांच्या मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असा विश्वास संपादन करून आरोपीने मार्च २०२३ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी रक्कम उकळली.
या प्रकरणातील आरोपी डॉ. प्रशांत रानडे (वय ६५) हे रुरल इन्स्टिट्यूट आयुर्वेदिक रिसर्च सेंटर, मायणी (ता. खटाव, जि. सातारा) चे संचालक असून, ते सध्या काजूपाडा, बोरीवली पूर्व, मुंबई येथे वास्तव्यास आहेत. आरोपीने फिर्यादीकडून १३,११,००० रुपये स्वीकारूनही मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला नाही, तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही.
या प्रकरणी राजेश पुंजाजी पाखरे यांनी १६ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या आदेशान्वये पोलीस हवालदार संजय घिके करीत आहेत. वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.