'लग्नाचे आमिष, नोकरीचे गाजर... दोन वर्षे शारीरिक शोषण; गर्भवती झाल्यावर पैसे देऊन सेटलमेंट करण्याचा प्रयत्न; जीवे मारण्याची धमकी; मलकापूरात गुन्हा'

 
मलकापूर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): लग्न करण्याचे आमिष दाखवत तब्बल दोन वर्षे एका महिलेचे कथित शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार मलकापूर शहरात उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर पीडित महिला गर्भवती झाल्यानंतर आरोपीने लग्नास स्पष्ट नकार देत तिचा अपमान केला, पैसे देण्याची ऑफर दिली आणि नकार मिळाल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील ३८ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश राजू टाक (वय ३५, रा. रामदेव बाबा नगर, मलकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ५ ऑगस्ट २०२४ ते २५ मे २०२६ या कालावधीत आरोपीने पीडित महिलेला लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. महिलेने विरोध करूनही आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर पीडितेने पोलिसांत जाण्याची तयारी दर्शविली असता आरोपीने स्वतःच्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करण्याचे, तसेच तिला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनांवर विश्वास ठेवून पीडितेने तातडीने तक्रार केली नाही. मात्र आरोपीने वारंवार लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध कायम ठेवल्याचे  तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, पीडित महिला सुमारे तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाचा आग्रह धरला. मात्र आरोपीने लग्नास स्पष्ट नकार देत तिचा अपमान केला. एवढेच नव्हे तर प्रकरण मिटविण्यासाठी पैसे देण्याची तयारी दर्शविली. पीडितेने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ५६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९, ३५६(२), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करीत आहेत.