सोन्याचा मोह नडला! खामगावच्या बसस्थानक परिसरात घडलेली ही घटना वाचून योग्य तो बोध घ्या....नाहीतर....
Dec 25, 2023, 12:39 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यात जळकातेली भागात २३ डिसेंबरला एकाची आर्थिक व्यवहारातून फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली. सोन्याची गिन्नी कमी किमतीत विकत असल्याचे सांगून अज्ञाताने विक्री केली अडव्हांस रुपात १० हजार रुपयेही घेतले. मात्र गिन्नी बनावट असल्याचे कळताच ग्राहकाची तारांबळ उडाली. ग्राहक आकाश श्रीनाथ (रा. राहटा ता.खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खामगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.
जाहिरात 👆
सविस्तर तपशील असा की, २० डिसेंबर रोजी तक्रारदार आकाश नारायण श्रीनाथ ( रा. राहटा) खामगाव बसस्थानक परिसरात उभे होते. दरम्यानच एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येवून म्हणाला की, माझ्याकडे काही सोने आहे कोणी घेणार असेल तर कळवा. मी सोने कमी किमतीत देऊ शकतो. त्यानंतर श्रीनाथ यांनी सोने घ्यायला कोठे यायचे असे विचारले? व त्याचे नाव,गाव विचारले असता त्यानी मोबाईल नंबर देऊन आकाश श्रीनाथ यांना (बनावट)सोन्याची गिनी दाखवली. एक दिवस उलटून गेल्यानंतर २२ डिसेंबरला त्या अज्ञाताचा फोन आला, तो म्हणाला की,तुम्ही व्यवहार कधी करणार आहे? आणि करायचा असेल तर तुम्ही उंद्री(उदयनगर) गावात या ! मात्र श्रीनाथ यांनी त्याला खामगावातच भेटायला सांगितले.
त्यानुसार २३ डिसेंबर रोजी दोघे खामगाव तालुक्यातील जनुना शिवारात जळका तेली रोडवर भेटले. त्यावेळी अज्ञात आरोपीने त्याच्या जवळील सोन्याची गिंन्नी दाखवून परत घेतली व त्याच्याकडील पांढऱ्या पिशवीमध्ये ठेवली, व म्हणाला की, तुम्ही आत्ताच पैसे द्या, चेक करून घ्या त्यावेळी श्रीनाथ यांनी आम्ही खामगाव येथे तपासतो असे सांगितले व अज्ञात आरोपीला दहा हजार रुपये रोख ॲडव्हान्स स्वरूपात दिले. बाकी रक्कम खामगावला देतो असे सांगून ते तपासणीसाठी खामगावला निघाले. त्यावेळी बाकीचे पैसे नंतर घेतो.. तुमचा काय तो निर्णय लवकर कळवा असे सांगून अज्ञात आरोपी पसार झाला. मात्र सोन्याची गिन्नी तपासल्यानंतर ती बनावट धातूची असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर श्रीनाथ यांनी वारंवार अज्ञात आरोपीला फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फोन बंद येत होता. अशाप्रकारे अज्ञाताने बनावट सोन्याची विक्री करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तक्रारदार श्रीनाथ यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय खांबलकर करीत आहेत.