शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष; ५६ लाखांची फसवणूक करणारा पुण्यातून गजाआड! सायबर पोलिसांची कारवाई; म्हणे मी, शेअर मार्केटमधला एक्सपर्ट माणूस! बुलढाण्याच्या महिलेची झाली होती फसवणूक...

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून बुलडाणा येथील महिलेसह इतर नागरिकांची तब्बल ५६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर पोलीसांनी पुणे येथून अटक केली आहे. या प्रकरणी उर्वशी रवींद्र सुरोशे, रा. सोळंके ले-आउट, बुलडाणा यांनी २९ जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

आरोपी तातेराव मानिकराव लोंढे उर्फ रती कुमार गर्ग (रा. पुणे) याने सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत स्वतःला शेअर बाजारातील तज्ज्ञ असल्याचे सांगून फिर्यादीच्या घरातील दोन खोल्या भाड्याने घेतल्या. यानंतर पैसे गुंतवा, दोन महिन्यांत दुप्पट परतावा देतो, असे आमिष दाखवून फिर्यादीकडून १० लाख आणि इतर साक्षीदारांकडून ४६ लाख रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात उकळले.

फसवणूक केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, चार महिन्यांच्या शोधमोहीमेनंतर २४ मे रोजी विश्रांतवाडी, पुणे येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून बँकेची पासबुक्स, एटीएम कार्डे, पाच मोबाईल फोन (अंदाजे किंमत ₹१.८१ लाख), असा एकूण ₹२.५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीस २७ मेपर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावण्यात आली असून, पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे, एएसआय शकील खान, राजदीप वानखेडे, विकी खरात, क्षितिज तायडे, तंत्रज्ञ राजू आडवे आणि ऋषिकेश खडेराव करीत आहेत.
बुलडाणा सायबर पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.