अवैध दारु विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई; 28 देशी दारुच्या बॉक्ससह ४.८ लाखांचा एवज केला जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 
 

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तससेवा) : अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ डिसेंबर रोजी  अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करीत २८ देशी दारुच्या बॉक्ससह ४ लाख ०८ हजार ६४० रुपयांचा एवज जप्त केला. 
जिल्ह्यात अवैध देशी, विदेशी व हातभट्टी दारू बाळगून चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पोनि. सुनील अंबुलकर, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस स्टाफची स्वतंत्र पथके तयार करून वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले होते.या अनुषंगाने १४ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, काही इसम त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये देशी दारूचे बॉक्स बाळगून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने अमडापूरवरून ग्राम मंगरूळ नवघरे चौफुलीकडे येत आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ग्राम मंगरूळ नवघरे चौफुली येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान आरोपी नामे (१) सुरेश जगन्नाथ सवडतकर, वय ४२ वर्षे, रा. अमडापूर, ता. चिखली आणि (२) शुभम विजय भालेराव, वय २५ वर्षे, रा. अमडापूर हे त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनामधून देशी दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आले. आरोपींच्या ताब्यातून (१) देशी दारूचे २८ बॉक्स, किंमत १,०८,६४० रुपये आणि (२) मारुती सुझुकी कंपनीची एस-प्रेसो पांढऱ्या रंगाची कार, किंमत ३,००,००० रुपये असा एकूण ४,०८,६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.पकडलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन अमडापूर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस स्टेशन अमडापूर करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने तसेच  श्रेणिक लोहा, अपर पोलीस अधीक्षक, खामगाव आणि अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोनि. सुनील अंबुलकर, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. अविनाश जायभाये, पोना. अनंता फरताळे, सुनील मिसाळ, पोकी अमोल शेजोळ, गणेश वाघ, सतीश नाटेकर, मपोकॅ पूजा जाधव आदी स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथील पथकाने ही कारवाई केली.