अपहरण झालेल्या बालिकेचा लावला शोध;मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात, आरोपी युवकास केली अटक...
Nov 14, 2025, 15:48 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सन २०२२ मधील अपहरण गुन्ह्यातील पिडीत बालिकेचा शोध घेऊन तिला मध्यप्रदेशमधील प्रितमपुर, जिल्हा इंदौर येथून सुरक्षित ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, बुलढाणा यांनी यश मिळवले आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, बुलढाणा यांना जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमधील अपहरण व हरवलेल्या बालकांच्या गुन्ह्यांचा तपास करून पिडीत मुलांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि सुनील अंबुलकर यांनी पोउपनि संजय ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकांना बालक शोध व आरोपी शोध मोहिमेसंबंधी आवश्यक निर्देश दिले होते.
तामगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 40/2022, कलम 363 भादंवि अंतर्गत अपहरणातील पिडीत बालिका आणि संशयित विक्की प्रकाश गव्हांदे (वय 26, रा. वाका, ता. संग्रामपूर) हे प्रितमपुर, इंदौर (मध्यप्रदेश) परिसरात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती.
त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पथकाने प्रितमपुर येथे जाऊन तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलढाणा यांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. त्यात पिडीत बालिका व संशयित विक्की गव्हांदे हे दोघेही एकत्र आढळून आले. पथकाने दोघांना ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी तामगाव पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले आहे. पुढील तपास तामगाव पोलिस करीत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा (खामगाव), अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पोनि सुनील अंबुलकर (प्रभारी अधिकारी – स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक कक्ष), पोउपनि संजय ठाकरे तसेच पथकातील सहायक पोउपनि मनोहर बोरसे, सहायक पोउपनि अविनाश जाधव, मपोहेकॉन निर्मला कंकाळ, पोकॉन राचिन शेंद्रे, पोहेकॉन राजू आडवे (तांत्रिक विश्लेषण विभाग) यांचे विशेष योगदान राहिले.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, बुलढाणा यांच्या मार्फत इतरही हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.